सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वा खाली स्वच्छतेची मोहीम
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत सफाई कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे मानवत शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येला मानवत नगरपरिषद प्रशासनाने कृतीतून चोख उत्तर दिले आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आणि हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ केले. गेल्या काही दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली होती. अस्वच्छते मुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी तातडीने पालिकेच्या विविध विभागांची बैठक घेऊन स्वच्छते साठी पर्यायी यंत्रणा उभी केली. आज सकाळपासूनच प्रशासकीय अधिकारी, अभियंते, लिपिक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये धडक स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी स्वतः झाडू हातात घेऊन रस्त्यावरील कचरा गोळा करण्यास सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या काही तासांतच शहरातील प्रमुख मार्ग आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यात प्रशासनाला यश आले.
आंदोलन बेकायदेशीर, कारवाई होणार – मुख्याधिकारी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात युनियनने १० ऑगस्ट रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर केले होते. त्यानंतर प्रशासनाला मुदत देण्यात आली होती. मात्र मागण्यांवर अपेक्षित निर्णय न झाल्याचा आरोप करत कामगारांनी २७ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या बाबत खुलासा करताना मुख्याधिकारी कोमल सावरे म्हणाल्या, आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी हे नगरपरिषदेचेच कर्मचारी आहेत. मात्र त्यांनी सादर केलेल्या निवेदनातील कोणतीही मागणी प्रशासन स्तरावर प्रलंबित नाही. याबाबत त्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. मागण्या प्रलंबित नसताना देखील आंदोलन सुरू ठेवण्यात येत आहे. प्रशासनाच्या दृष्टीने हे आंदोलन बेकायदेशीर असून यासंदर्भात आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. संपाच्या काळात ही शहराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने दाख विलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी दाखवलेला कृतीशील आदर्श हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.





















