दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मौजे धारासुर ता. गंगाखेड येथील समस्त गावकरी मंडळींनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना. सुनेत्राताई अजित पवार यांना दिनांक २६/०९/२५ रोजी सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रतिलिपी आ. रत्नाकररावजी गुट्टे गंगाखेड विधानसभा व आ. राजेशदादा विटेकर पाथरी विधानसभा यांना देण्यात आली आहे. निवेदनातील ०६ प्रमुख मागण्या अशा की सप्टेंबर २०२६ खरीप विमा मिळणे बाबत, ४५ दिवस पाऊसाचा खंड पडल्यामुळे पिकनुकसान, १०० टक्के दुष्काळ जाहीर करणे, गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन बांधकामास गती देणे, धारासुर, चिंच टाकळी (वितीरिका) कॅनॉलला गेले १५ वर्षे पासून पाणी येत नाही, शेतीवर अवलंबून असणारे शेत मजूर यांना रो.ह. कामे देणे किंवा आर्थिक मदत जाहीर करणे, विमा कंपनी सॅटेलाईट द्वारे पीक पाहणी करते ते निकष रद्द करण्यात यावे. सप्टेंबर २०२५ ला अतिवृष्टी झाली व गोदावरीचे पाणी शेतात आल्याने सोयाबीन, कापूस, तुर सर्व पिके नष्ट झाली होती. कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार जिल्हाधिकारी, आमदार, पालक मंत्री, पुनर्वसन मंत्री या सर्वांनी धारासुर येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. शासनाने याची दखल घेऊन अतिवृष्टी अनुदान मंजूर केले व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, परंतु आय. सी. आय. विमा कंपनीने जाणीवपूर्वक खरीप पीक विमा गंगाखेड तालुका व काही मंडळे या पासून वगळले आहेत. तो तात्काळ मिळावा. या वर्षी पावसाने ४५ दिवस खंड दिल्यामुळे भीषण दुष्काळ आहे. जनावरांना पाणी व चारा नाही. गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धनाचे बांधकाम २ वर्षापासून चालू आहे, परंतु कामाची गती फार हळू चालत आहे. कामाची गती वाढविण्या साठी पुरातत्व विभागाला आदेश देणे धारासुर ते चिंचटाकळी कॅनॉल (वितरीकेला) गेले १५ वर्षापासून पाणी येत नाही. या बाबत पाट बंधारे विभागाला आदेश द्यावा. बरेच शेतमजूर शेतीवर अवलंबून असतात. यावर्षी शेतातील पिके नष्ट झाल्यामुळे शेत मजुराला काम नाही. मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावी किंवा शेत मजुरांना आर्थिक मदत द्यावी. विमा कंपनी सॅटेलाईटद्वारे पिक पाहणी करते. पीक वरून पाहिल्या मुळे चांगले दिसत नाही. हा निकष रद्द करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर बालासाहेब नेमाणे, निवृत्ती कदम, लक्ष्मण कदम, जयराम कदम, ज्ञानेश कदम, नारायण शिंदे, बळीराम दुगाने यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.























