उप विभागीय अधिकारी पाथरी यांना तक्रारीचे निवेदन सादर
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
तालुक्यातील कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गोर सेना मानवत तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण व सहकारी गणेश जाधव यांनी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र, सदर कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, तसेच रेती, खडी व मुरूम यांचा योग्य दर्जा व प्रमाणाबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. तसेच पुनर्वसन निधीतून ज्या ठिकाणी कामे मंजूर करण्यात आली आहेत, त्या नियोजित ठिकाणी कामे न करता इतर ठिकाणी करण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.यामुळे शासनाच्या पुनर्वसन निधीचा योग्य पद्धतीने वापर होत आहे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रत्यक्ष पाहणी करून तपासणीची मागणीमंजूर अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, मंजूर कामाचे ठिकाण, प्रत्यक्ष करण्यात आलेले काम, वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य, कामाची गुणवत्ता तसेच झालेला खर्च यांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विशेषतः रेती, खडी व मुरूम यांचा दर्जा आणि वापराचे प्रमाण याची प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करावी, असेही निवेदनात नमूद आहे.चौकशीदरम्यान अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम अथवा शासनाच्या पुनर्वसन निधीचा गैरवापर आढळून आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार अथवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करून शासनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कुंभारी तांडा येथील पुनर्वसन निधीतून करण्यात आलेल्या सर्व कामांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दिलीप चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, मानवत तसेच जिल्हाधिकारी, परभणी यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
























