दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
तालुक्यातील कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कामांमध्ये निकृष्ट दर्जाची रेती, खडी व मुरूम वापरला जात असल्याचा आरोप करत संबंधित कामांची तातडीने स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कुंभारी तांडा येथे पुनर्वसन निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून परिसरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे अपेक्षित असताना, सुरू असलेल्या कामांमध्ये बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी पुढे आल्या आहेत. कामासाठी वापरण्यात येणारी रेती, खडी व मुरूम निकृष्ट दर्जाचा असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे, काही मंजूर कामे ज्या ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या पुनर्वसन निधीचा नेमका वापर कशा पद्धतीने होत आहे, कामे मंजूर आराखड्यानुसारच होत आहेत का आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.अंदाजपत्रकापासून मोजमाप पुस्तिकेपर्यंत तपासणीची मागणीया प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. संबंधित कामांचे मंजूर अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, कामाचे प्रत्यक्ष मोजमाप, वापरण्यात आलेले साहित्य आणि त्याचा दर्जा तसेच आतापर्यंत झालेल्या खर्चाची तपासणी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या रेती, खडी आणि मुरूमचा दर्जा व वापराचे प्रमाण तांत्रिक पद्धतीने तपासण्यात यावे. मंजूर कामे आणि प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे यांची तुलना करून त्यात तफावत आढळते का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अनियमितता आढळल्यास कारवाईची मागणीचौकशीमध्ये कामाच्या गुणवत्तेत तफावत, निधीचा गैरवापर अथवा अन्य कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच शासनाच्या निधीचे नुकसान झाले असल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.याबाबत गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, विजय राठोड, विकास चव्हाण आणि विजय चव्हाण यांनी मानवत तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, मानवत तसेच जिल्हाधिकारी, परभणी यांनाही देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी व तांत्रिक तपासणी केली जाते का, तसेच चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे कुंभारी तांडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.























