दिलीप चव्हाण
तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत येथील प्रतिष्ठित नेताजी सुभाष विद्यालयात शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ प्रामाणिक सेवा बजावलेले कुशाबा योगाजी दवंडे हे आज नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेचा गौरव म्हणून विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते. के. वाय. दवंडे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा गौरवपर आढावा घेतला. के. वाय. दवंडे यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात अत्यंत शिस्तबद्ध, प्रामाणिक व सेवाभावी वृत्तीने काम केले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता ज्ञाना सोबत संस्कार आणि जीवन जगण्याची दिशा देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे. नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी कर्तव्य, संस्कार आणि माणुसकीची शिकवण कधीच निवृत्त होत नाही, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. एक अभिमानास्पद पर्वाचा आज सेवेतून समारोप झाला असून आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व सर्व दवंडे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.























