टाकी बांधूनही वस्ती तहानलेली; जिल्हा परिषद शाळेलाही पाण्याची सुविधा नाही
महेंद्र गाढे
ग्रामीण प्रतिनिधी मानवत
मौजे मंगरुळ बु. ता. मानवत जि. परभणी येथील कॅम्प दलित वस्ती परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वस्तीच्या जवळ पाण्याची टाकी बांधण्यात आली असली तरी या टाकीचा नागरिकांना कोणताही फायदा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याच परिसरातील जिल्हा परिषद शाळेलाही पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून कॅम्प दलित वस्तीतील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
दरम्यान, २५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने, संतप्त नागरिकांनी आज १ सप्टेंबर २०२६ रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात आनंद कांबळे, सखाराम शेळके, दीपक साखरे, बाबुराव घुगे, मक्सुद खान पठाण, नंदुबाबाई बनसोडे, संगीता घुगे यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले आहेत.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन वस्तीला नियमित पाणीपुरवठा सुरू करावा तसेच जिल्हा परिषद शाळेला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.





















