दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री विरोधात सलग दोन दिवस विशेष मोहीम राबवत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारूच्या १२६ बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघां विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २४ सप्टेंबर रोजी पोलीस शिपाई बंकट अंतराम लटपटे यांच्या फिर्यादी वरून हटकरवाडी ते शिरशी रस्त्यावर कारवाई करण्यात आली. या मध्ये चंद्रकला नंदू शिंदे हिच्या कडून देशी दारूच्या ८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्दे मालाची किंमत ६४० रुपये असल्याचे नोंदीत नमूद आहे. त्याच दिवशी पोलीस कर्मचारी सूर्यकांत ज्ञानोबा फड यांच्या फिर्यादी वरून मानवत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत काशीनाथ तुकाराम कांदे याच्या कडून देशी दारूच्या ९६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्दे मालाची किंमत ७ हजार ६८० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यानंतर २५ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी माणिक दत्तात्रय डुकरे यांच्या फिर्यादीवरून कोथळा – राजुरा मार्गावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत युसुफ अली शेख याच्याकडून देशी दारूच्या २२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत १ हजार ७६० रुपये होती. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आलेल्या या सलग कारवायांमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मानवत पोलिसांनी अशा बेकाय देशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.























