दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सकल दिगंबर जैन बांधवांच्या आत्म शुद्धीचा पवित्र असा दशलक्षण पर्व पर्युषण महापर्व’ अत्यंत आनंदात, भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पर्वाच्या निमित्ताने दररोज सकाळी श्री भगवंतांचा अभिषेक, जिनेंद्र पूजा, दशलक्षण धर्म पूजा यांसह विविध धार्मिक विधी-विधान अत्यंत भाविकतेने पार पडले. या विशेष आत्मशुद्धीच्या पर्वाचे औचित्य साधून मानवत येथे प्रथमच दहा दिवसीय प्रवचन मालेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनमालेत सेलू येथील प्रसिद्ध जैन अभ्यासक श्री निलेशजी बिनायके यांनी मुख्य प्रवचनकार म्हणून मार्गदर्शन केले. आपल्या सुश्राव्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करताना श्री निलेशजी बिनायके म्हणाले की, “उत्तम सुखप्राप्तीसाठी आणि आत्मिक शांतीसाठी फक्त आपला आत्माच कारणीभूत आहे. देवपूजा, गुरुवंदना, स्वाध्याय, उपवास आणि दान या सर्व शारीरिक आणि बाह्य क्रिया आहेत. जोपर्यंत या क्रिया करण्यामागील खरा भाव आणि उद्देश समजत नाही, तोपर्यंत या केवळ बाह्यक्रिया ठरतात. या क्रियांमुळे पुण्य नक्कीच मिळेल, परंतु शाश्वत सुख आणि आत्मिक शांती मिळेलच याची शाश्वती नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “प्रत्येक जीवात आत्मा वसलेला आहे. हा आत्मा उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य या दहा धर्मांच्या गुणांनी ओळखला जातो. परंतु आपल्या तील क्रोध, अहंकार, मायाचारी, अशुद्धता, असत्य, असंयम या विकारांमुळे आत्म्याचे मूळ स्वरूप प्रकट होत नाही. त्यामुळे शाश्वत सुखासाठी या दहा गुणांचा अंतः करणापासून अभ्यास करणे हाच एकमेव मार्ग आहे. वक्त्यांचा सत्कार व भाविकांचे मनोगत पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी (अनंत चतुर्दशी) दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रवचनकार श्री निलेशजी बिनायके (सेलू) यांचा श्री चंद्रकांतजी मेहेत्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयकुमारजी काला यांचा सत्कार श्री. प्रभाकर काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित श्रावक – श्राविकांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही प्रवचनमाला अत्यंत उद्बोधक, जीवनोपयोगी आणि भावस्पर्शी झाल्याची भावना व्यक्त केली. सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी मोनिका काला, प्रतिभा मेहेत्रे, अलका कहेकर, प्रा. डॉ. सुरेश मेहेत्रे, डॉ. विजयकुमार कहेकर तसेच सुनील केरे यांच्यासह सकल जैन समाजातील श्रावक – श्राविकां नी विशेष परिश्रम घेतले. कार्य क्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरेश मेहेत्रे यांनी केले, तर आभार संदीप काळे यांनी मानले.























