केकरजवळा, रामपुरी महसूल मंडळातील शेतकरी संकटात; तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
तालुक्यातील केकरजवळा व रामपुरी महसूल मंडळात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर व मूग या पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.केकरजवळा व रामपुरी महसूल मंडळातील केकरजवळा, रामेटाकळी, वझुर, कुंभारी, वांगी, थार, रामपुरी, हटक्करवाडी, सारंगापूर, मंगरूळ व हमदापूर या गावांमध्ये पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा परिणाम जाणवत आहे. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळातच पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कापूस, तूर आणि मूग पिकांनाही पावसाअभावी फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे व मशागतीवर मोठा खर्च केला असून आता पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तात्काळ पंचनाम्याची मागणीपावसाअभावी झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी, तसेच शासनाच्या निकषानुसार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.





















