दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
वझुर येथे शिव तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.मिरवणुकीत शिव तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तरुणांनी टाळ-मृदंगाच्या तालावर विविध धार्मिक गीते व जयघोष करत मिरवणुकीत उत्साह वाढविला.मिरवणुकीदरम्यान गावातील प्रमुख मार्गांवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, युवक आणि नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेत मिरवणुकीत सहभाग नोंदविला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.























