दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत
मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील शेतकरी बन्सी आश्रोबा चोखट, वय ५५ वर्षे, रा. सारंगपूर ता. मानवत यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांनी शेती साठी महाराष्ट्र ग्रामीण बँक मानवत व जिल्हा मध्यवर्ती बँक मंगरूळ या दोन्ही बँकांचे कर्ज होते. बँकेचे कर्ज झाले आहे, मी ते कसे फेडू” या ताण-तणावात ते सतत चिंतेत राहत असत. “मला जगावेसे वाटत नाही” असे ते कुटुंबियांजवळ बोलून दाखवत असत. कुटुंबीय त्यांची समजूत काढून काळजी करू नका, मनात असे विचार आणू नका असे सांगत होते. दिनांक २७/०९/२०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास बन्सी चोखट हे घरातून शेताकडे गेले. तेथून त्यांनी त्यांचा मुलगा पांडुरंग यास फोन करून मला शेतीचे खूप कर्ज झाले आहे, ते मी फेडू शकत नाही, मी औषध पिऊन जीव देत आहे असे सांगितले. पांडुरंग याने तात्काळ ही माहिती चुलत भाऊ अनिल यास दिली. माहिती मिळताच अनिल ज्ञानोबा चोखट, त्यांचा लहान भाऊ गोविंद ज्ञानोबा चोखट व चुलत भाऊ माणिक संदीपान चोखट यांनी शेताकडे धाव घेतली. तेथे बन्सी चोखट हे चिंचाच्या झाडाखाली पडलेले दिसले, त्यांच्या शेजारी विषारी औषधाचे डबे पडलेले होते. त्यांना तेथून मोटारसायकलवर गावात आणून ग्रामीण रुग्णालय मानवत येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी पोलीस स्टेशन मानवत येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाळवदे हे करत आहेत.























