दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दि. २ सप्टेंबर रोजी मानवत येथे अखंड मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात शेकडो मराठा बांधवांनी रस्त्यावर ठिय्या मांडत वाहतूक रोखून धरली. या आंदोलनामुळे मानवत – परभणी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती त्या मुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी “एक मराठा, लाख मराठा” आणि आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात विशेषतः युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. संतप्त आंदोलकांनी टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मानवत पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात जो पर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मानवत तालुक्यात या पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.





















