दिलीप चव्हाण
तालुका प्रतिनिधी मानवत
मराठवाडा नगरपरिषद व महानगर पालिका कामगार कर्मचारी युनियन (लाल बावटा) AITUC संलग्न, नगरपरिषद मानवत शाखेच्या वतीने नगरपरिषद मानवतच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मानवत नगरपरिषदेत स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वास्तविक पाहता त्या मागण्या नसून ती नगरपरिषद प्रशासनाने करावयाची नियमित कामे आहेत, परंतु प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. या मागण्यांसंदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद मानवत यांना दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. निवेदनात दि. 25 ऑगस्ट 2026 पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास दि. 27 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे आज दि. 27/08/2026 रोजी मानवत नगरपरिषद कार्यालयासमोर सफाई कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे असून यात 10 वर्षे, 20 वर्षे व 30 वर्षाची कालबद्ध पदोन्नती (Time Bound Promotion) वेळेवरच देण्यात यावी. 10% व 14% DCPS कपातीची माहिती सर्व सफाई कामगारांना लेखी स्वरूपात देण्यात यावी. खास रजा (Special Leave) ज्या महिन्यात घेतली असेल त्याच महिन्यात मंजूर करण्यात यावी. कायमस्वरूपी एक पारगी कामाचे आदेश मिळावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत आंदोलनात कॉम्रेड लिंबाजी कचरे पाटील, कॉम्रेड आसाराम बुरखुंडे तसेच युनियनचे अध्यक्ष कार्तिक मजमुले, उपाध्यक्ष संजय दवणे, सचिव रवि धबडगे, कॅशियर आकाश धापसे, सेक्रेटरी सागर गाडे यांच्यासह प्रल्हाद भदर्गे, पद्मपाणी भदर्गे, राजेश भदर्गे, सुनील वाल्मिकी, भारती बागडे, सीमा मजमुले, कविता डंबाळे व सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी कामगारांनी व्यक्त केला आहे.






















