दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत
तालुक्यातील कुंभारी तांडा येथे सन २००६ मध्ये झालेल्या पुनर्वसनानंतर नागरिकांच्या रहदारीसाठी वापरात असलेल्या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रस्त्यावरील अडवणूक दूर करावी तसेच शरद बाबुराव कुलकर्णी यांच्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.कुंभारी तांडा येथे सन २००६ मध्ये पुनर्वसन करण्यात आले असून, पुनर्वसनासाठी शासनाच्या नियमानुसार जमीन संपादित करण्यात आली होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जमीन देणारे शेतमालक शरद बाबुराव कुलकर्णी यांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने शासनाकडून मोबदला अथवा निधी देण्यात आला आहे. मात्र, सध्या पुनर्वसित वस्तीतील नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.या अडवणुकीमुळे पुनर्वसित वस्तीतील नागरिकांना रहदारीस अडचणी निर्माण होत असून, प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर रस्ता पुनर्वसनाच्या मंजूर आराखड्यात व महसूल अभिलेखात नेमका कोणत्या स्वरूपात दर्शविण्यात आला आहे, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.तहसील प्रशासनाने सन २००६ मधील पुनर्वसनाचा मंजूर आराखडा व नकाशा तपासावा, रस्त्याची हद्द व मालकी याबाबत अधिकृत मोजणी करावी, तसेच पुनर्वसनासाठी संपादित जमिनीचा मोबदला व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.चौकशीत सार्वजनिक रहदारीचा मार्ग अडविल्याचे स्पष्ट झाल्यास अडथळा तात्काळ दूर करावा. तसेच शरद बाबुराव कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक रहदारीस अडथळा निर्माण केला असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार ठोस व कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.याबाबत गणेश जाधव, क्रिष्णा चव्हाण, विजय राठोड, विकास चव्हाण, विजय चव्हाण यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन तहसीलदार, मानवत यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, मानवत, जिल्हाधिकारी, परभणी तसेच संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.























