दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत शहरात आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. श्री गणेश चंद्र पत्रकार फार्मसी महाविद्यालयाच्या वसतिगृहात घुसून विद्यार्थिनीसह शहरातील अनेक नागरिकांवर हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आज एक पिसाळलेला कुत्रा थेट फार्मसी कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसला त्याने प्रथम एका विद्यार्थिनीला चावा घेतला. तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या वॉर्डन तेजश्री हापसानकर यांना ही या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर तो कुत्रा महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून थेट जिजाऊ नगर परिसरात शिरला आणि तेथेही नागरिकांवर हल्ले चढवण्यास सुरुवात केली या हल्ल्यात श्रद्धा डख, तेजश्री हापसानकर (वॉर्डन), रोहिदास बनगर, द्वारकाबाई भाकरे, प्रल्हाद जाधव, शिवण्या भिसेवाड, ईश्वरी निर्मल, मंदाबाई चव्हाण, बाबासाहेब साळवे या सर्व जखमींवर मानवत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र काही जखमींना जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मानवत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसें दिवस गंभीर होत चालला असून नगर परिषदेने तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.






















