दिलीप चव्हाण
तालुका प्रतिनिधी मानवत
पात्र प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीमध्ये आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांनी केले आहे. मा. निवडणूक आयोग व मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या निर्देशा नुसार आणि मा. उप विभागीय अधिकारी पाथरी व मा. तहसीलदार मानवत यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता के.के.एम. महाविद्यालय मानवत येथे SIR (Special Intensive Revision) अंतर्गत नवीन मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार तथा कॅम्पचे नोडल अधिकारी श्री. संजय खिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदवणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन देखील करण्यात आले. या शिबिराला महाविद्यालयाचे उपप्राचार्य हुगे सर, लांडगे सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कॅम्पमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या शिबिरात जवळपास ३० ते ३५ नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील संगणक चालक राहुल खाडे, बापू रासवे आणि मुख्याध्यापक चंद्रकांत पौळ यांनी परिश्रम घेतले.























