मानवत तालुक्यातील केकरजवळा गावाजवळ मंगळवारी रात्रीची घटना
दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
पाथरीकडून पोखर्णीच्या दिशेने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री सातच्या सुमारास मानवत तालुक्यातील केकरजवळा गावाजवळ घडली.मयत युवकाचे नाव उमेश दत्तराव नवले (वय २३, रा. केकरजवळा) असे आहे. तर ओमकार शिंदे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४३ बीआर ३००० क्रमांकाची कार पाथरीकडून पोखर्णीच्या दिशेने जात होती. दरम्यान, केकरजवळा गावाजवळ समोरून येणाऱ्या एमएच १२ एफक्यू ५९०६ क्रमांकाच्या दुचाकीला कारची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील उमेश नवले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले ओमकार शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे केकरजवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.





















