दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यात गेल्या ३४ ते ३५ दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिला आहे. परिणामी खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन पूर्ण पणे जळून गेले असून कापूस आणि तूर या पिकांची ही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मानवत तालुका तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी संयुक्त किसान मोर्चा व शेतमजूर युनियन यांच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांना तहसील प्रसासना मार्फत देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पावसा अभावी शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतावर कामे नसल्याने ग्रामीण भागातील शेत मजुरांना नाशिक, मुंबई सारख्या शहरांकडे कामासाठी स्थलांतर करावे लागत आहे. शेतकरी – शेतमजुरांचे आर्थिक प्रश्न अत्यंत बिकट झाले असून संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. मानवत तालुक्यातील शेतकरी – शेतमजुरांना या दुष्काळी परिस्थिती तून बाहेर काढण्यासाठी शासनाने खालील मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी केली आहे मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना एकरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना तात्काळ नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, पीक विमा योजनेतील रद्द करण्यात आलेले ३ ट्रिगर तात्काळ चालू करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप तातडीने करावे, ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याची जमीन ठेक्याने किंवा बटईने कसण्यासाठी घेतली आहे, अशा प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनाही एकरी ७० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीही पीक पाहणी करून त्यांनाही एकरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६ चा १७,५०० रुपयांचा प्रलंबित पीक विमा तात्काळ देण्यात यावा, निराधार, वृद्धपकाळ, दिव्यांग योजनांचे थकलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे आणि मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत सदर मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास मानवत तालुक्यातील शेतकरी – शेतमजूर तहसील कार्यालयासमोरील मानवत पाथरी मुख्य रस्त्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला असून निवेदनावर कॉ. लिंबाजी कचरे पाटील, कॉ. अशोक बुरखुंडे, कॉ. बालासाहेब आळणे, कॉ. लिंबाजी धनले, राजेभाऊ काकडे, वामनदादा गोलाईत,संजय देशमुख, बाबाराव आळणे, दिगांबर मांडे, अशोकराव बारहाते, गोविंद घांडगे, बाळासाहेब निर्मळ, दत्तराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, एकनाथ बारहाते, उद्धव काळे यांच्या सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.























