दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यात गेल्या ३४ ते ३५ दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीनचे पीक अक्षरशः जळून खाक झाले असून कापूस आणि तूर या पिकांचीही वाढ खुंटली आहे. शेतात कामे नसल्याने शेतमजुरांवर नाशिक, मुंबई सारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीने हतबल झालेल्या ईरळद येथील रणरागिणी शेतकरी महिला गटाच्या महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत मानवत तहसील कार्यालयावर धडक दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तहसीलदारांमार्फत त्यांनी निवेदन सादर केले. यावेळी महिला शेतकऱ्यांनी ७ प्रमुख मागण्या मांडल्या – मानवत तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी ७० हजार भरपाई द्यावी, संपूर्ण कर्जमाफी व नवीन पीककर्ज द्यावे, पीक विम्यातील रद्द केलेले ३ ट्रिगर सुरू करून तात्काळ विमा वाटप करावे, ठेका-बटईदार व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनाही एकरी ७० हजार भरपाई द्यावी, २०२५-२६ चा प्रलंबित १७,५०० रुपयांचा विमा द्यावा, निराधार, श्रावणबाळ, दिव्यांग योजनांचे थकलेले अनुदान जमा करावे व रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करावीत. या निवेदनावर भारती मुळे, अर्चना मुळे, वृंदावनी कचरे, मीरा बारहाते, रेखा ठाकूर, सुनिता मुळे, रत्नमाला कचरे, पद्मा बारहाते, लक्ष्मी बारहाते, शांताबाई मुळे, रेणुकाबाई लंगोटे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मागण्या मान्य न झाल्यास मानवत-पाथरी मुख्य रस्त्यावर तीव्र रस्ता रोको करू, असा इशारा रणरागिणी महिला गटाने दिला आहे. दरम्यान, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी विविध पक्ष – संघटनां कडून तहसील कार्यालयात निवेदनांचा पाऊस पडत आहे.























