दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मराठा, मराठा-कुणबी आणि कुणबी – मराठा समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मानवत तालुक्यात दिनांक १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मानवत तहसीलचे प्रभारी तहसीलदार संजय खिल्लारे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे. नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांचे पत्र क्र. जा. क्र. २०२६/संकीर्ण/कावी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्देशा नुसार हे अभियान राबवले जात आहे. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली मराठा आरक्षणाच्या पार्श्व भूमीवर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेला गती देण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर दि. १० सप्टेंबर रोजी मंडळ रामपुरी मंडळ, ११ सप्टेंबर मानवत व केकरजवळा मंडळ, १५ सप्टेंबर रोजी कोल्हा व ताडबोरगाव मंडळ येथे आयोजित केले जाणार आहे. सदर शिबिरे सर्व महसूल मंडळांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहेत. ज्या नागरिकांकडे जुने महसुली पुरावे, शैक्षणिक पुरावे किंवा कुणबी नोंदी उपलब्ध आहेत अशा सर्व पात्र नागरिकांनी संबंधित महसूल मंडळाच्या शिबिराला आवश्यक कागदपत्रां सह भेट द्यावी. या शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधण्यास मदत केली जाईल, पुराव्यांची व वैधानिक कागदपत्रांची जागेवरच तपासणी केली जाईल आणि नवीन जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज थेट स्वीकारले जातील पात्र नागरिकांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असून नागरिकांनी वेळेत अर्ज करून या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार संजय खिल्लारे यांनी केले आहे.























