दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैल पोळा सण मानवत तालुक्यात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा खरा सोबती, वर्ष भर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने तालुक्यातील शहरा सह प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण होते. पहाटे पासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना नदीवर, ओढ्यावर नेऊन त्यांची स्वच्छ धुलाई केली. त्यानंतर शिंगांना हिंगूळ लावून, शिंगांमध्ये बेगड, रंगीबेरंगी झुली, मोरखी, गळ्यात गोंड्याच्या माळा, पायात घुंगरू बांधून बैलजोडीला सजवण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या पाठीवर आकर्षक नक्षीकाम केलेल्या झुली टाकल्या होत्या. दुपार नंतर गावातील मारुती मंदिर परिसरात बैलजोडी ची एकत्रित पारंपारिक पूजा करण्यात आली. गावातील जेष्ठ मंडळींनी बैलांचे औक्षण केले. पुरण पोळीचा नैवेद्य भरवून बैलांचे पूजन करण्यात आले यावेळी शेतकरी बांधवांनी बैलां बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आमचा बळीराजा सुखी राहो अशी प्रार्थना केली. तालुक्यातील सर्वच गावां मध्ये बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल – ताशाच्या गजरात लहान मुले, तरुणांनी पोळ्याचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना बैलावर बसवून फोटो काढले. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असली तरी पोळा सणांच्या उत्साहावर याचा कोणता ही परिणाम दिसून आला नाही गावा गावात एकोप्याने आणि आनंदाने पोळा साजरा झाला. सायंकाळी घरोघरी पुरण पोळीचा स्वयंपाक करून कुटुंबा सह सणाचा आनंद घेण्यात आला. बैलपोळा हा केवळ सण नसून तो शेतकरी आणि बैल यांच्या तील अतूट नात्याचे प्रतीक आहे, हे आज पुन्हा एकदा मानवत तालुक्यात दिसून आले.























