सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
दिलीप चव्हाण
तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यातील मौजे पिंपळा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील दिपक उर्फ यशवंत गणेश शिंदे यांच्या घरात काल मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की स्फोटाच्या हादऱ्याने घराच्या दोन्ही बाजूच्या भिंती पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाल्या. घरातील कपाट, धान्य, कपडे, सोने - चांदीचे दागिने, रोख रक्कम, भांडी - कुंडी असे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले असून शिंदे कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काल बैलपोळा सण असल्याने शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या वडिलांच्या घरी एकत्रित जेवणासाठी गेले होते व तेथेच रात्री मुक्कामी थांबले होते. त्यामुळे घरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर कुटुंब घरात असते तर मोठी जीवितहानी झाली असती. स्फोटाची तीव्रता इतकी होती की भिंतीचे दगड उडून २० ते ३० फुटांवर असलेल्या शेजारील घरावर जाऊन पडले, त्यामुळे शेजारील घराच्या पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले असून पत्रे चेंबली गेली आहेत. मध्यरात्री झालेल्या या प्रचंड आवाजाने संपूर्ण पिंपळा गाव हादरले व ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी व ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा प्रशासना सह तालुका प्रशासनाला कळवली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मानवत पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे शिंदे कुटुंब उघड्यावर आले असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करून नुकसान ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.























