दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत
मानवत तालुक्यात गेल्या 50 ते 55 दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीन पीक जळून खाक झाले असून कापूस, तूर पिकाचीही अत्यंत दुरावस्था झाली आहे. पावसा अभावी शेतातील कामे बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांवर नाशिक, मुंबई, पुण्यासारख्या शहरात रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. शेतकरी – शेतमजुरांचे आर्थिक प्रश्न अत्यंत बिकट झाले असून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) व किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे. तहसीलदार मानवत यांना निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात म्हटले आहे की मानवत तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या असून मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 70 हजार रु. व भूमिहीन शेतमजुरांना 30 हजार रु. श्रम नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून नवीन पीककर्ज तात्काळ द्यावे, पीक विम्यातील रद्द केलेले 3 ट्रिगर चालू करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे तात्काळ वाटप करावे, ज्या शेतकऱ्यांनी ठेका बटाईने शेत जमीन केलेली आहे, त्यांना ही एकरी 70 हजार रु. नुकसान भरपाई द्यावी, शासकीय जमिनीवर अतिक्रमण असणाऱ्या शेतकऱ्यांची देखील पीक पाहणी करून त्यांना ही एकरी 70 हजार रु. नुकसान भरपाई द्यावी, अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना 2025-26 चा 17,500 रु. पिक विमा तात्काळ द्यावा, निराधार, विधवा, वृद्धकाळ, दिव्यांग योजनांचे थकलेले अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे, मागेल त्याला रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ द्यावे, बंद झालेली माझी लाडकी बहीण योजना तात्काळ सुरू करावी, कसत असलेल्या गायरान जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या नावे कराव्यात, घरकुल योजनेचे थकीत हप्ते तात्काळ जमा करावेत, सर्व पिकांसाठी 100% पीक विमा भरपाई मंजूर करून त्वरीत वाटप करावीव जनावरांसाठी चारा छावणी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरीत करावी, नियमित कर्जदा रांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे या निवेदनावर कॉ. अशोक बुरखुंडे, रुक्मिणी शिंदे, कॉ. नंदकुमार लांडगे, गयाबाई साबळे, रामभाऊ आठवे, प्रयागबाई साळवे, प्रयागबाई काळे, विष्णू लांडगे, सुदाम भिसे, नारायण टगुळे, भीमराव पांचाळ, बायणाबाई पवार, आश्रुबाई आवचार, लक्ष्मी आवचार, बळीराम खंदारे, अमृत खटे, मधुकर आवचार, मंडूबाई पवार, पार्वती कदम यांच्या सह शेतकरी – शेतमजूर महिला – पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.























