दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधि मानवत
परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित गुणवंत विद्यार्थी आदर्श व उपक्रमशील शाळा गौरव समारंभात पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवतने बाजी मारली आहे. नवोदय परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल कु. जानवी एकनाथ हिरवे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कु. आर्या पदमकुमार कहकर, ओम किरण गौड आणि कु. अनुष्का योगेश भायेकर या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. मेघना दीदी बोर्डीकर यांच्या शुभहस्ते, जि.प. अध्यक्ष श्रीमती लता विजयकुमार वाकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, शिक्षण सभापती सौ. वैशाली पंकजराव आंबेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे उपक्रमशील तथा आयडॉल टीचर म्हणून श्री. संजय वसंतराव पकवाने यांना सन्मानित करण्यात आले. तसेच परभणी जिल्ह्यातून आदर्श आणि उपक्रमशील शाळा म्हणून पीएम श्री जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतचा गौरव करण्यात आला. परभणी – वसमत रोडवरील अक्षदा मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलाचे संचालक मा. दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांनी आधुनिक युगात उत्तम नागरिक घडवण्या साठी भविष्यवेधी विद्यार्थी कसा घडेल यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जि.प. उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, शिक्षणाधिकारी संजय ससाने, श्रीमती बिर्गे मॅडम, श्रीमती झिंजुर्के मॅडम यांच्यासह शिक्षण विभागाने सुंदर आयोजन केले होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. राणीताई गोलाईत, सदस्य श्रीराम पकवाने, रामभाऊ गोलाईत, मुख्याध्यापक माणिक घाटूळ व सर्व शिक्षकवृंद, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवत तालुक्याची जिल्ह्यात मान उंचावल्याबद्दल मा. पंकज भैय्या आंबेगावकर यांनी शाळेचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून मित्र परिवाराकडूनही कौतुक होत आहे.























