दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
शासनाने दुष्काळी परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली असून मराठवाड्यात, विशेषत परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळा मुळे झालेल्या नुकसानी ची भरपाई करण्यासाठी सरकार सरसकट मदत करणार आहे. येत्या दोन दिवसांत दुष्काळ निवारणा साठी शासनाकडून आदेश जारी करण्यात येणार असून रबी पिकांना ही मदत दिली जाईल अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत घोषणा केली असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी २४ सप्टेंबर रोजी मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रकाश श्रीरंग काळे यांच्या गट नं ७३ मधील शेतातील पिकांची स्थिती, झालेली हानी आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. यंदाच्या अनिय मित व अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिके मोठ्या संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्व भूमीवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी पालकमंत्री बोर्डीकर यांनी थेट संवाद साधला. पाण्याची टंचाई, वाढलेला उत्पादन खर्च, करपलेली पिके आणि आर्थिक संकट या बाबत शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसान ग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असा विश्वास पालक मंत्र्यांनी व्यक्त केला. दौऱ्या दरम्यान बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर निर्मळ, पंचायत समितीचे सभापती विष्णू निर्मळ, उपसभापती सुरज काकडे, प्रेरणाताई वरपुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जि. प. सदस्य कृष्णा शिंदे, कृ. उ. बा. समिती संचालक आकाश चौखट, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गोविंद भाऊ काळे, तालुका अध्यक्ष हरिभाऊ निर्मळ, चेअरमन दत्ता काळे, मा. उपसरपंच गोपाळ काळे, मा. उपसरपंच विठ्ठल काळे, विलास काळे, ता. अध्यक्ष विकास मगर, केशव काळे, अर्जुन काळे, माणिक मोगरे, उत्तम गोरे, आत्माराम काळे, शिवाजी बोचरे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, मंडळ अधिकारी गौतम, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या सह स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून दुष्काळी परिस्थिती बाबत शासन गांभीर्याने दखल घेत असल्याचा संदेश या दौऱ्यातून मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.























