दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मौजे कोथाळा ता. मानवत जि. परभणी हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असून ही आजही दुधना नदीवर पूल नसल्याने या भागातील २५ गावांचा संपर्क तुटत आहे. या मुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत असून तात्काळ पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी कोथाळा येथील ग्रामस्थांनी राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री ना. मेघना दिदी साकोरे – बोर्डीकर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. २४ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, दुधना नदीवर पूल नसल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. शेतकऱ्यांच्या ऊस, कापूस व इतर शेतमालाच्या वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर होते. आणि जर कोथाळा येथे दुधना नदीवर पुलाचे काम झाले तर पाथरी मार्गे मानवत – कोथाळा ते जिंतूर हा प्रवास अत्यंत सोयीचा होणार असून सुमारे २५ ते ३० किलो मीटरचे अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षापूर्वी पाथरी ते जिंतूर मानवत – कोथाळा मार्गे एसटी बस सेवा सुरू होती, परंतु पुला अभावी ती बंद करावी लागली दुधना नदीच्या काठावर असलेल्या पारडी गावा पासून जिंतूर पर्यंत डांबरी रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे फक्त नदीवर पूल झाल्यास मानवत – कोथाळा – पारडी – जिंतूर हा थेट व सोयीचा मार्ग सुरू होईल ज्याचा फायदा कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना व प्रवाशांना होईल अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर अर्जुन बाबुराव पाते, ज्ञानेश्वर रघुनाथ शिध्दनाथ, कोंडीबा रेणाजी बावणे, उत्तम राघोजी गोरे, जळबा लिंबाजी गोरे यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शासनाने तात्काळ दखल घेऊन पूल मंजूर करावा अशी अपेक्षा संपूर्ण परिसरातील जनते तून व्यक्त होत आहे.























