दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ऊस ही सर्व पिके पाण्या अभावी सुकून गेली आहेत. या गंभीर पार्श्व भूमीवर मानवत तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपये मदत व पिक विमा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख प्रभाकर रामराव कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन तहसिलदार मानवत यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरां साठी चारा – पाण्याची टंचाई निर्माण झाली असून अनेक शेतकरी कुटुंबे स्थलांतराच्या उंबरठ्यावर आहेत कर्जबाजारी शेतकरी हतबल झाला असून कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत. मानवत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार मदत द्यावी, खरीप पिक विमा सन २०२६ मंजूर करून बंद केलेले ट्रिगर पुन्हा लागू करावेत, वीज बिल माफी द्यावी, गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर व चारा उपलब्ध करावा, ऊसासाठी जायकवाडीचे पाणी सोडावे, शेतमालाला हमीभाव द्यावा, रोजगार हमी योजनेतून मजुरांना काम द्यावे व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ कोरा करून नवीन कर्ज वाटप करावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर तालुका प्रमुख प्रभाकर कदम, गणेशराव मगर, गजानन जाधव, अर्जुन आवचार, शिवराम गिरी, अर्जुन कदम, रामकिशन बारहाते, अशोक, दत्ता होंडे, रामेश्वर निर्वळ, आप्पा भिसे , सुरेश जाधव, शिवाजी मुळे, बालाजी दहे, मुंजा उपाडे, अर्जुन विश्वनाथ शिंदे, शेख युनुस शेख, शिवाजी सोरेकर यांच्या सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.























