दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्व भूमीवर परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात १२ सप्टेंबर शनिवारी रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीस तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी कोमल सावरे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक वाघमारे, प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ बिक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी गणेशोत्सव ही सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे सांगत सर्व गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. उत्सव काळात ध्वनीप्रदूषण टाळणे, गणेशमूर्तीची सुरक्षित स्थापना करणे, सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी मानवत शहरातील सामाजिक सलोख्याचा विशेष उल्लेख केला.गणेशोत्सवा दरम्यान विविध सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठानांच्या माध्यमातून अन्नदानाचे उपक्रम राबविले जातात तसेच हिंदू – मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत उत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही पेठ मोहल्ला परिसरात गणेशभक्तांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपस्थित मुस्लिम बांधवांनी जाहीर केले. या बैठकीस गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, मुस्लिम धर्मगुरू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ बिक्कड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार विलास मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपणारा उत्सव आहे. मानवत शहरात दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवितात. यंदाही शांतता, सुव्यवस्था आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात उत्सव साजरा करण्याचा निर्धार शांतता समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.























