दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वर भीषण अपघात झाला असून महामार्गावरील खड्ड्याने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. किन्होळा शिवारात आज दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास MH 24 AR 4671 क्रमांकाच्या स्कूटी आणि MH 22 AN 2698 क्रमांकाच्या ऑटोची जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटना स्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि स्कूटीचा चक्काचूर झाला होता. हे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगावर शहारे आले. या भीषण अपघातात स्कूटीस्वार कृष्णा बालाजी पोंदाळ (22, रा. मानवत) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या सावित्री बालाजी पोंदाळ (40, रा. मानवत) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून किन्होळा ते खरबड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून ठिक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्ष दर्शी आणि नागरिकांनी केला आहे. महामार्गावरील हे खड्डे आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत असून, संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी ही मागणी सामान्य जनतेतुन होत आहे.























