दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
गेल्या 50 दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने मानवत तालुक्यातील खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने सह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनां च्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तालुका प्रशासनास सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद ही खरीप पिके पूर्णपणे करपली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न केला असला तरी वार्षिक पिके असलेली हळद आणि संत्रा यांनाही मोठा फटका बसला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास संत्रा आणि हळदही जळून जाण्याची भीती असून येणारा रब्बी हंगाम ही अडचणीत येणार आहे. त्यामुळे सरकारने कोणतेही पंचनामे व निकष न लावता तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, थकबाकीदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान द्यावे, 2026 चा प्रलंबित पीक विमा तात्काळ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अन्यथा २१ सप्टेंबर रोजी शहरातील महाराणा प्रताप चौक येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख किशोर भाऊ ढगे यांच्या नेतृत्वा खाली छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदना वर युवा तालुकाध्यक्ष दत्तराव परांडे, तालुकाध्यक्ष नामदेव काळे, विठ्ठल चौकट, किशनराव शिंदे, गोपाळराव काळे, महादेव काळे, दत्तराव काळे, नितीन काळे, उत्तमराव जोगदंड, बाळासाहेब काळे, अशोक कदम, योगेश चौकट, अक्षय चौकट, कृष्णा चौकट, संजय चौकट यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.























