दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी मानवत येथे भेट देत ग्रामीण रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रे आणि विविध आरोग्य विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. मात्र या दौऱ्याची चर्चा आरोग्य सुविधांच्या आढाव्या बरोबरच सुट्टीच्या दिवशी झालेल्या तपासणीमुळेही रंगली आहे. डॉ. भोकरे यांनी सर्वप्रथम मानवत ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयात उभारण्यात आलेल्या “आरोग्यदूत गणराया – निरोगी महाराष्ट्र” या देखाव्याचे त्यांनी अवलोकन केले. आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि जनजागृतीचे प्रभावी सादरीकरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या नंतर त्यांनी शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (बौद्धवाडा परिसर), तलाव कट्टा येथील अर्बन हेल्थ सेंटर आणि पाळधी रोड येथील अर्बन हेल्थ सेंटर येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. बौद्धवाडा येथील आपला दवाखाना येथे भेटीदरम्यान शिवसेना दलित आघाडीचे शहरप्रमुख आदर्श धबडगे यांनी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आरोग्य केंद्रातील काही सुविधांच्या कमतरतेबाबत माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुसेन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेहान शेख, रुग्ण कल्याण समिती सदस्य राणा संजय नाईक तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयसीटीसी विभागाच्या कामकाजाची घेतली माहिती. डॉ. भोकरे यांनी ग्रामीण रुग्णालयातील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (ICTC) विभागालाही भेट दिली. गर्भवती महिलांची एचआयव्ही तपासणी, ईआयडी सेवा, लिंक एआरटी सेंटरमधील उपचार घेणारे रुग्ण, एलएफयू रुग्णांचा शोध, इंडेक्स तपासणी तसेच व्हायरल लोड ड्यू लिस्ट यासंदर्भातील कामकाजाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी समुपदेशक राजू कच्छवे आणि कपिल भराड यांनी सविस्तर आढावा सादर केला. यावेळी नागरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर दिला जात आहे,” असे डॉ. भोकरे यांनी सांगितले.























