दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी मानवत
मानवत तालुक्यात गेल्या 50 दिवसां पासून पावसाने मोठी दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके पूर्ण पणे करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच अनुषंगाने २१ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वाजता मानवत शहरातील महाराणा प्रताप चौक येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे मानवत तालुकाध्यक्ष विठ्ठलराव चौखट यांनी केले आहे. यात विविध मागण्या करण्यात येणार आहेत कोणतेही निकष व पंचनामे न लावता मानवत तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, थकबाकीदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, 2026 चा प्रलंबित पीक विमा तात्काळ वाटप करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चौखट यांनी केले आहे.























